Tuesday, February 21, 2012

९० च्या दशकातील रविवार

परवाचीच गोष्ट! माझ्या बॉसच्या बायकोने मला रविवारी जेवायला बोलावले होते. मस्तपैकी छोले भटुरेचा बेत होता. जेवण उरकून मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. निरनिराळ्या विषयांवर. मग त्यातच भारतात असताना रविवार कसा घालवायचो याबद्दल चर्चा सुरू झाली आणि मी एकदम विचारात पडलो.

खरंच, काय मजा असायची. "आमच्या वेळी असे होते-तसे होते" हे म्हणायला ही गोष्ट काही फारशी जुनी नाही आणि मी ही काही एवढा मोठा (वयाने) नाही (पुणेकर असतो तर म्हटलो असतो कदाचित. संदर्भ: पुलं चे निरीक्षण). माझी शाळा कधी सकाळ अधिवेशनाची तर कधी दुपार अधिवेशनाची. त्यामुळे सकाळी नियमित उठण्याचा ठावठिकाणा नव्हता. पण रविवारी मात्र दात घासून, तोंड धुवून, हातात गरमागरम चहाचा कप आणि कांदेपोहे घेऊन मी सकाळी ७ वाजता टी. व्ही. समोर हजर व्हायचो. 'रंगोली' पासून कार्यक्रमांना सुरूवात. माझ्या आईबाबांचा घरी 'केबल' घेण्यास विरोध , त्यामुळे अगदी दहावीपर्यंत मी डीडी नॅशनल , डी डी मेट्रो आणि डी डी सह्याद्रीच बघत आलो आहे. 'रंगोली' मधील गाणी पाहताना चाखलेल्या त्या चहाची गोडी अविटच! गाणी पाहून झाल्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मटणासाठी खाटकाच्या दुकानात रांग लावणे. हा कार्यक्रम कितीही कंटाळवाणा वाटला तरीही दुपारच्या खमंग जेवणाची स्वप्ने बघत कसातरी निभावून न्यायचो.

घरी येईपर्यंत ९ वाजलेले असायचे . ही वेळ म्हणजे 'सन्डे मॉर्निंग प्राइम टाइम'. ह्या वेळेत मी लहानपणापासून अनेक कार्यक्रम पाहत आलोय. मला कळायला लागल्यापासून पहिला कार्यक्रम म्हणजे 'रामायण'. राम-रावण युद्धात बाणांमधून निघणार्‍या ज्वाळा आणि पाऊस पाहून थक्क व्हायचो. पुढे कार्यक्रम बदलत गेले. 'महाभारत' आले. त्याची जागा पुढे 'चंद्रकांता'ने घेतली. मिलिंद सोमणची 'कॅप्टन व्योम' सारखी अगदीच पकाऊ सिरीयल सुद्धा रस घेऊन पाहिल्याचे आठवते. पण तो रस रविवारमुळे होता हे आता समजतंय. १० वाजता छोट्यांसाठी कार्यक्रम चालू व्हायचे. मोगली आणि राधा यांचं 'जंगल बुक' तर एक नंबर. ९० च्या दशकात मोठे झालेले आम्ही शेरखान, बगिरा, भालू, अकडू आणि पकडू यांना कधी विसरू शकू असं वाटत नाही. याचबरोबर मिकी माउस, डक टेल्स, टेल स्पिन ह्या कार्टून सिरीयल्स ही तेवढ्याच मजेदार आणि दर्जेदार. अंकल स्क्रूजचे कारनामे आणि लॉंच पॅडचा गोंधळ पाहण्याची मजा काही औरच.


हे सगळ चाललेले असताना स्वयंपाकघरातून मटणाचा वास दरवळू लागे आणि पोटात कावळे ओरडायला सुरूवात. मग दुपारी छायागीत किंवा शक्तिमान पाहताना, आईच्या पाककलेतील कौशल्याची स्तुती करत जेवणावर ताव मारीत असे. पोटभर आणि मनपसंत जेवल्याने लगेच ग्लानी यायची आणि लगेच सोफ्यावर पहुडायचो.

संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी (दूरदर्शनवाल्यांनी अशी विचित्र वेळ का निवडली हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे.) सह्याद्रीवरचा मराठी चित्रपट चालू झाला की लगेच जाग यायची. याकाळात मी अनेक दर्जेदार मराठी चित्रपट पाहिले आहेत. ९० नंतर मराठी चित्रपटसृष्टी जवळ जवळ संपुष्टात आल्याने मराठी चित्रपट बघण्याचा एकमेव स्रोत म्हणजे रविवारी दुपारी डी डी सह्याद्री. चहा, खारी आणि टोस्ट बरोबर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची अफलातून कॉमेडी म्हणजे धमालच! महेश कोठारेचे कारनामे (डॅम इट!!), भालजींचे शिवरायांवरचे सिनेमे, सूर्यकांत-चंद्रकांत आणि जयश्री गडकर यांचे ग्रामीण महाराष्ट्राचे अचूक जीवनदर्शन घडवणारे चित्रपट यांना खरंच तोड नाही.

चित्रपट संपल्यावर सातच्या बातम्या पाहायचो आणि कॉलनीत भटकून यायचो. मग रात्रीचे जेवण आणि सुरभि बघता-बघता उरलेला गृहपाठ. काहींना वाटेल की काय रविवारचा दिनक्रम आहे ? एकही प्रोडक्टिव काम केलं नाही . पण या रविवाराने मला आयुष्यात बरंच काही दिले आहे, शिकवले आहे. कौटुंबिक जिव्हाळा, गल्ली क्रिकेट, अंडरआर्म टूर्नामेंट आणि अशा कितीतरी अनेक गोष्टी ह्या वाराने जपल्यात. इथे अमेरिकेत वीकेंड असतो. शनिवार-रविवार सुट्टी. बर्‍याच गोष्टी आहेत करायला. लॉंग ड्राइव, ट्रेकिंग, रॅफटिंग वगैरे न संपणारी यादी . पण माझ्या 'त्या' रविवारची सर ह्याला येऊ शकत नाही , किंबहुना येणारही नाही कधीच.

असाच एक रविवार आयुष्यात परत येण्याच्या प्रतीक्षेत!!

अमित लिंबसकर

1 comment:

  1. Ekdum zhakaas article lihila aahes :)
    Mala pan Indiatla ravivar athavla ani saglya athvani taajya zhalya :)
    -Rohit

    ReplyDelete