Tuesday, February 21, 2012

"CLASS" (शिकवणी)

कालच 'शाळा' पाहिला. अपेक्षांवर खरा उतरला नाही पण त्यानंतर झालेल्या चर्चेमूळे आणि 'इनर सर्कल ' मधील मित्रांनी उद्युक्त केल्याने बरेच दिवसांनी हा लेख लिहायला घेतला. चित्रपटात देशमाने गुरुजींचा 'क्लास' पाहिला आणि मग विचारचक्र काही केल्या थांबेना.

'क्लास' हा आपल्या जीवनाचा किती अविभाज्य घटक झाला आहे हे मला काल खऱ्या अर्थाने उमगले. ह्या विषयावर मी आधी कधीच गंभीरपणे विचार केला नाही याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. पहिली दुसरीत असताना कधीतरी कोणत्या एका ताईकडे 'शिकवणी'ला गेल्याचे स्मरते. आता त्यावेळी तिने काही शिकवला वैगेरे नाही म्हणा, आणि मी पण तिकडे जाऊन नुसता गृहपाठच करायचो. मला सतत वाटायचं की घरीबसून सुद्धा हेच करायचं तर तिकडे कशाला जायचं. सुदैवाने मला हे लवकर सूचल्याने पुढची ४-५ वर्षे तरी मी 'क्लास' ह्या संकल्पनेपासून दूर राहिलो. सातवी असताना मात्र आमच्या आईसाहेबांच्या मैत्रिणीने 'क्लास'चे 'महत्व' पटवून दिल्याने मला जबरदस्ती 'क्लास'ला जावे लागले. माझी शाळा दुपार अधिवेशनाची असल्यामुळे मी आरामात ९ वाजता उठत असे , पण ह्या 'क्लास'ने माझ्या साखरझोपेतल्या स्वप्नांना सुरुंग लावला. मला अजूनही आठवतं की आठ , सव्वा आठच्या दरम्यान मी 'क्लास'मध्येच डुलक्या घ्यायला लागायचो.

एक गंमत सांगतो. आमच्या शाळेत एक सर होते. इथे नाव सांगत नाही पण त्यांच्याकडे जाणार्‍या जवळ जवळ प्रत्येक विद्यार्थ्याला गणितात पूर्ण गुण मिळायचे. त्यामुळे त्यांचा 'क्लास' एकदम हाऊसफूल. मला काही त्यांचा 'क्लास' लावण्यात रस नव्हता कारण त्यांचा घर माझ्या घरापासून बराच लांब होतं. मी नेहमी विचार करायचो की मी एवढा प्रयत्न करून सुद्धा मला गणितात कधीच पूर्ण गुण मिळत का नाहीत? एकदा त्या सरांच्या 'क्लास'मधल्या एका मित्राचा तीन दिवस पिच्छा पुरवाल्यानंतर ह्या महाभगांनी मला त्यांचा 'सीक्रेट' सांगितलं. तो म्हणे की सर म्हणतात," देवाच्या कृपेने हे उदाहरण परीक्षेत येऊ देत", मग आपण समजून जायचं की ते नक्की येणार. गणिताच्या पेपरला पाठांतर करून जायचा अशी कबुली पण दिली. तर शाळेतल्या सरांच्या 'क्लास'चं हे एकंदरीत स्वरूप !

आठवीत असताना आमच्या वर्गाची सेमी इंग्रजी माधम्यासाठी निवड झाल्याने आमच्या आईसाहेबांच टेन्शन अजून वाढलं आणि मग मला 'क्लास' लावण्याखेरीज गत्यंतर उरलं नाही. यावेळी 'क्लास' आमच्या वर्गशिक्षकांचाच. म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यांचं दोनदा दर्शन ! चाळीतल्या एका 'वन प्लस वन' खोलीच्या वरच्या मजल्यावर आमचा हा 'क्लास' चालायचा. बसायला बाकंसुद्धा नव्हती. जमिनीवरच मांडी घालून बसावं लागायचं. शिवाय वर पत्रे असल्याने भयंकर उकडत असे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय इंग्रजीतून होते पण ह्या 'क्लास'मध्ये मी फक्त मराठीचं इंगजी भाषांतरच शिकत होतो. मला तिकडे शिकण्यात काही रस नव्हता. मी माझी नवी कोरी 'BSA Trailblazer' सायकल घेऊन कुणी 'शिरोडकर' भेटते का याचाच शोध घ्यायचो. :D नववी , दहावीला इयत्तेबरोबरच 'क्लास'चा 'दर्जा' वाढला आणि 'एन.जी.के.' क्लासेस मध्ये माझं अॅडमिशन झालं. आता मी शाळेबरोबर 'क्लास'मध्ये पण बाकावरच बसत होतो मात्र शालान्त परीक्षेच्या निकालात काही जास्त फरक पडला नाही.

अकरावी बारावी म्हणेज ह्या क्लासेसचा सूळसूळाट ! प्रत्येक विषयासाठी वेगळा 'क्लास'. त्यात आय. आय. टी. , एन. डी. ए. ह्यांच्यासाठीसुद्धा वेगळा 'क्लास'. बहुतेकजण आपला सगळा वेळ ह्या क्लासेस मध्येच घालवतात. मी मात्र अकरावी 'rest year ' म्हणून 'क्लास' न लावण्याचा निर्णय घेतला होता पण आता आईची जागा बाबांनी घेतली आणि अकरावीचे वर्ष महत्वाचे कसे याची पारायणे झाली. मग मी असाच एक साधा 'क्लास' लावला. इंजिनिअर , डॉक्टर वैगेरे मंडळींचा तो 'पार्ट टाइम' व्यवसाय होता. त्याच काळात 'चाटे' क्लासेस चे प्रकरण खूप गाजले. अवघ्या महाराष्ट्रात त्यांचे वर्ग चालायचे. मुंबईत तर दर दुसऱ्या स्थानकावर यांचा 'क्लास'. पण नंतर आयकर विभागाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडली आणि 'चाटे'ला त्यांनी चाटून पुसून खाल्लं. :D बारावीत असताना 'अग्रवाल क्लासेस' ला मला अॅडमिशन मिळालं नाही म्हणून 'सिन्हाल क्लासेस'ला घ्यावं लागलं. ह्या 'अग्रवाल क्लासेस'ची पण अजब तऱ्हा आहे. दहावीचा निकाल लागला रे लागला की त्याच दिवशी ह्यांचे अॅडमिशन्स फुल ! आणि गंमत म्हणजे इथे जे शिक्षक शिकवतात तेच इतरही क्लासेस मध्ये जाऊन शिकवतात. त्यामुळे 'अग्रवाल क्लासेस'ची एवढी 'हवा' का ? हा अजूनही न उलगडलेला प्रश्न आहे. तर बारावीचे हे क्लास म्हणजे सलग ३ महिने दर दिवशी ७-८ तासांचा तुरुंगवास. दहा बाय दहा च्या खोलीत ३ ए.सी. लावलेले आणि वरून फिजिक्स ,केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स. थंडीने अक्षरशः कुल्फी व्हायची. हे क्लास म्हणजे मला कोंडवाडा वाटतो. मेंढरांना आत बंद करायचं आणि वेळ संपली की सोडून द्यायचं.

एकदाची बारावी झाली आणि म्हणालो सुटलो ह्या 'क्लास'च्या जाळ्यातून एकदाच तर इन्जिनिअरिन्ग 'दत्त' म्हणून समोर उभी! इन्जिनिअरिन्गसाठीपण क्लासेस असतात हे ऐकून तर धक्काच बसला होता पण मग 'विद्यालंकार क्लासेस' हे शब्द लवकरच परवलीचे झाले. त्यात थ्री डे क्रॅश कोर्स हा सगळ्यांचाच आवडीचा ! पूर्ण टर्म टंगळमंगळ करून ३ दिवसात अभ्यासक्रम पूर्ण. माझे काही महाभाग मित्र ह्या कोर्सेस साठी घरून पैसे घ्यायचे आणि पुढचे ३ दिवस कॉलेजच्या वाचनालयात बसून अभ्यास करायचे. मग ह्याच पैश्यांतून परीक्षा संपल्याच्या आनंदाच्या आणि निकालाच्या दिवशी 'K T'च्या 'गम'मध्ये पार्ट्या ! T.E. , B.E. मध्ये परदेशात जाण्याची तयारी चालू झाली आणि त्यासाठी GRE , TOEFL साठी पण 'क्लास' लावणे आलेच. 'मेडिकल'चे विद्यार्थी आमच्यापेक्षा थोडे अधिक नशीबवान कारण 'क्लास'शी त्यांचा संबंध बारावीनंतरच तुटतो . थोडक्यात काय तर 'क्लास' हा आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे.

काहीही असो पण एवढ्या वर्षांत 'क्लास'ला जाऊन काहीच उपयोग झाला नाही असं मात्र मी म्हणणार नाही. आठवीतल्या 'क्लास' मध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या पाटील सरांनी इंग्रजीचं व्याकरण इतकं चांगलं शिकवलं की आजतागायत मला ते परत शिकण्याची कधीच गरज भासली नाही. पुढे दहावीत असताना संस्कृत व्याकरणासाठी मी एक पंधरा दिवसांची व्याख्यानमाला लावली होती. आमच्याच शाळेतला निलेश वाकडे नावाचा एक माजी विद्यार्थी व्याकरण शिकवायचा. त्याने शिकवलेलं क वि धा वि , क भू धा वि आणि इतरही बऱ्याच गोष्टी आजही लक्षात आहेत. कधी कधी मी विचार करतो की ह्या दोनच शिक्षकांसाठी मी क्लास लावून एवढी वर्षे फुकट घालवली का? शिकवण्या , क्लासेस यांची खरच गरज होती का ? ह्या प्रश्नाने द्विधा मनस्थितीत आणून सोडलाय मला .

बोकिलांची 'शाळा' वाचली तेव्हा ७० च्या दशकात पण 'क्लास' अस्तित्वात होते ह्या गोष्टीचा नवल वाटलं. माझ्या मते ही संकल्पना पूर्वापार चालत आली आहे पण गेल्या २० एक वर्षात ती जास्त प्रभावी झाली आहे आणि आताच्या युगात एक फॅशन झाली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. हल्ली मुलं नर्सरीमध्ये गेली की लगेच त्यांचे आईबाप त्यांना 'क्लास'ला घालतात. आपला मुलगा इतक्या क्लासेसना जातो असे बढाई मारणारे पालक दिसले की त्यांची मला खरच कीव येते. 'क्लास'ला जाणे योग्य की अयोग्य हे ज्याचं त्याने ठरवावं पण ही 'क्लास' संस्कृती अशीच फोफावत राहिली तर नजीकच्या काळात 'शाळा' ही संकल्पना फक्त नाममात्र उरेल आणि तसं होणं म्हणजे आपल्या शिक्षणपद्धतीच्या मुळावरच घाव घालण्यासारखे होईल. आपल्या पिढीने त्यादृष्टीने प्रयत्न करावेत असं मला मनापासून वाटतं. 'क्लास'ला शाळेचा पर्याय म्हणून न पाहता पुरवणी वर्ग म्हणूनच बघयला शिकवलं पाहिजे. जर असं झालं तर 'शाळा' कादंबरी वाचून आपण आपली शाळा जशी 'miss' करतो तशीच भावी पिढी सुद्धा त्यांची शाळा 'miss' करू शकेल!

९० च्या दशकातील रविवार

परवाचीच गोष्ट! माझ्या बॉसच्या बायकोने मला रविवारी जेवायला बोलावले होते. मस्तपैकी छोले भटुरेचा बेत होता. जेवण उरकून मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. निरनिराळ्या विषयांवर. मग त्यातच भारतात असताना रविवार कसा घालवायचो याबद्दल चर्चा सुरू झाली आणि मी एकदम विचारात पडलो.

खरंच, काय मजा असायची. "आमच्या वेळी असे होते-तसे होते" हे म्हणायला ही गोष्ट काही फारशी जुनी नाही आणि मी ही काही एवढा मोठा (वयाने) नाही (पुणेकर असतो तर म्हटलो असतो कदाचित. संदर्भ: पुलं चे निरीक्षण). माझी शाळा कधी सकाळ अधिवेशनाची तर कधी दुपार अधिवेशनाची. त्यामुळे सकाळी नियमित उठण्याचा ठावठिकाणा नव्हता. पण रविवारी मात्र दात घासून, तोंड धुवून, हातात गरमागरम चहाचा कप आणि कांदेपोहे घेऊन मी सकाळी ७ वाजता टी. व्ही. समोर हजर व्हायचो. 'रंगोली' पासून कार्यक्रमांना सुरूवात. माझ्या आईबाबांचा घरी 'केबल' घेण्यास विरोध , त्यामुळे अगदी दहावीपर्यंत मी डीडी नॅशनल , डी डी मेट्रो आणि डी डी सह्याद्रीच बघत आलो आहे. 'रंगोली' मधील गाणी पाहताना चाखलेल्या त्या चहाची गोडी अविटच! गाणी पाहून झाल्यानंतर मग सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे मटणासाठी खाटकाच्या दुकानात रांग लावणे. हा कार्यक्रम कितीही कंटाळवाणा वाटला तरीही दुपारच्या खमंग जेवणाची स्वप्ने बघत कसातरी निभावून न्यायचो.

घरी येईपर्यंत ९ वाजलेले असायचे . ही वेळ म्हणजे 'सन्डे मॉर्निंग प्राइम टाइम'. ह्या वेळेत मी लहानपणापासून अनेक कार्यक्रम पाहत आलोय. मला कळायला लागल्यापासून पहिला कार्यक्रम म्हणजे 'रामायण'. राम-रावण युद्धात बाणांमधून निघणार्‍या ज्वाळा आणि पाऊस पाहून थक्क व्हायचो. पुढे कार्यक्रम बदलत गेले. 'महाभारत' आले. त्याची जागा पुढे 'चंद्रकांता'ने घेतली. मिलिंद सोमणची 'कॅप्टन व्योम' सारखी अगदीच पकाऊ सिरीयल सुद्धा रस घेऊन पाहिल्याचे आठवते. पण तो रस रविवारमुळे होता हे आता समजतंय. १० वाजता छोट्यांसाठी कार्यक्रम चालू व्हायचे. मोगली आणि राधा यांचं 'जंगल बुक' तर एक नंबर. ९० च्या दशकात मोठे झालेले आम्ही शेरखान, बगिरा, भालू, अकडू आणि पकडू यांना कधी विसरू शकू असं वाटत नाही. याचबरोबर मिकी माउस, डक टेल्स, टेल स्पिन ह्या कार्टून सिरीयल्स ही तेवढ्याच मजेदार आणि दर्जेदार. अंकल स्क्रूजचे कारनामे आणि लॉंच पॅडचा गोंधळ पाहण्याची मजा काही औरच.


हे सगळ चाललेले असताना स्वयंपाकघरातून मटणाचा वास दरवळू लागे आणि पोटात कावळे ओरडायला सुरूवात. मग दुपारी छायागीत किंवा शक्तिमान पाहताना, आईच्या पाककलेतील कौशल्याची स्तुती करत जेवणावर ताव मारीत असे. पोटभर आणि मनपसंत जेवल्याने लगेच ग्लानी यायची आणि लगेच सोफ्यावर पहुडायचो.

संध्याकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी (दूरदर्शनवाल्यांनी अशी विचित्र वेळ का निवडली हे अजूनही न उलगडलेले कोडे आहे.) सह्याद्रीवरचा मराठी चित्रपट चालू झाला की लगेच जाग यायची. याकाळात मी अनेक दर्जेदार मराठी चित्रपट पाहिले आहेत. ९० नंतर मराठी चित्रपटसृष्टी जवळ जवळ संपुष्टात आल्याने मराठी चित्रपट बघण्याचा एकमेव स्रोत म्हणजे रविवारी दुपारी डी डी सह्याद्री. चहा, खारी आणि टोस्ट बरोबर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची अफलातून कॉमेडी म्हणजे धमालच! महेश कोठारेचे कारनामे (डॅम इट!!), भालजींचे शिवरायांवरचे सिनेमे, सूर्यकांत-चंद्रकांत आणि जयश्री गडकर यांचे ग्रामीण महाराष्ट्राचे अचूक जीवनदर्शन घडवणारे चित्रपट यांना खरंच तोड नाही.

चित्रपट संपल्यावर सातच्या बातम्या पाहायचो आणि कॉलनीत भटकून यायचो. मग रात्रीचे जेवण आणि सुरभि बघता-बघता उरलेला गृहपाठ. काहींना वाटेल की काय रविवारचा दिनक्रम आहे ? एकही प्रोडक्टिव काम केलं नाही . पण या रविवाराने मला आयुष्यात बरंच काही दिले आहे, शिकवले आहे. कौटुंबिक जिव्हाळा, गल्ली क्रिकेट, अंडरआर्म टूर्नामेंट आणि अशा कितीतरी अनेक गोष्टी ह्या वाराने जपल्यात. इथे अमेरिकेत वीकेंड असतो. शनिवार-रविवार सुट्टी. बर्‍याच गोष्टी आहेत करायला. लॉंग ड्राइव, ट्रेकिंग, रॅफटिंग वगैरे न संपणारी यादी . पण माझ्या 'त्या' रविवारची सर ह्याला येऊ शकत नाही , किंबहुना येणारही नाही कधीच.

असाच एक रविवार आयुष्यात परत येण्याच्या प्रतीक्षेत!!

अमित लिंबसकर